Bihar Cabinet Ministers Nitish Kumar : नाट्यमय घडामोडीनंतर बिहारमध्येनितीश कुमार आणि भाजपा यांची सत्ता आली. याचदरम्यान नवीन सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. सर्वाधिक लक्ष असलेले गृहखाते अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडेच कायम आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे वित्त विभागाची तर उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्याकडे रस्ते बांधकाम आणि कृषी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मंत्री विजय चौधरी यांच्याकडे जलसंपदा, संसदीय कार्य, इमारत बांधकाम, परिवहन, शिक्षण आणि माहिती व जनसंपर्क ही खाती आहेत.
२८ जानेवारीला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन झाल्यापासून विभागांच्या विभाजनाची प्रतीक्षा होती. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांशिवाय ८ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. खातेवाटपाची फाईल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजभवनाकडे पाठवली होती. ती बिहार सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजभवनात नेली. त्यानंतर काही वेळातच राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या स्वाक्षरीने अधिसूचना जारी करण्यात आली.
जाणून घेऊया कोणाला कोणते खाते?
- मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे सामान्य प्रशासन, गृह खाते, कॅबिनेट सचिवालय, देखरेख, निवडणूक आणि असे सर्व विभाग आहेत जे कोणालाही दिलेले नसतील, त्यांचा कार्यभार आहे.
- उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे वित्त, व्यावसायिक कर, शहरी विकास आणि गृहनिर्माण, आरोग्य, क्रीडा, पंचायती राज, उद्योग, पशु आणि मत्स्यसंपदा, कायदा विभागाची जबाबदारी असेल.
- विजय कुमार सिन्हा यांच्याकडे कृषी, रस्ते बांधकाम, महसूल आणि जमीन सुधारणा, ऊस उद्योग, खाणकाम आणि भूविज्ञान, कामगार संसाधने, कला संस्कृती आणि युवा, लघु जलसंपदा, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाची जबाबदारी असेल.
- जलसंपदा विभाग, संसदीय कार्य, इमारत बांधकाम, परिवहन, शिक्षण, माहिती व जनसंपर्क विभाग विजयकुमार चौधरी यांच्याकडे असेल.