नवी दिल्ली: बिहारच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचा पक्ष जनता दल युनायटेड हा राष्ट्रीय जनता दलासोबतच्या महाआघाडीतून बाहेर पडत असल्याचे संकेत दिले आहेत. अलीकडेच माजी मुंख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात बोलताना नितीश यांनी घराणेशाहीवरून टीका केली होती. तेव्हापासून नितीश लालू यादवांच्या राजदपासून दूर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. नितीश पुन्हा एकदा एनडीएचा घटक होणार अशी चर्चा सुरू असताना लालू यादव आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
लालूंपाठोपाठ काँग्रेस देखील सक्रिय झाली असून मल्लिकार्जुन खरगे यांनी नितीश कुमारांशी फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. नितीश यांची समजूत घालण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी देखील बिहारच्या मुख्यमंत्र्यांना अनेकदा फोन केला. पण, नितीश यांनी लालूप्रसाद यादव आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन उचलण्यास नकार दिला. त्यांच्या ऑफिसकडून ते इतर कामात व्यग्र असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी एकदा नव्हे तर अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र बिहारचे मुख्यमंत्री व्यग्र आहेत.
नितीश कुमारांचे बाहेर पडण्याचे संकेतमागील काही दिवसांपासून बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपासोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. नितीश कुमार यांनी पलटी घेताच बिहारमधील आरजेडी आणि जदयूचे सरकार कोसळेल, ज्याचा परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर होईल. महाआघाडीत लालू यादव यांचा राजद, नितीश कुमार यांचा जदयू, काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांचा समावेश आहे. जेव्हा भारत सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली तेव्हा नितीश कुमार यांनी लगेचच पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. कर्पुरी यांना भारतरत्न मिळणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गावी पोहचून नितीश यांनी कर्पुरी यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांच्याबद्दल भाष्य केले. तसेच कर्पुरी यांनी कधीच आपल्या मुलाला पुढे आणले नाही. पण आता लोक केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करत आहेत, असे विधान त्यांनी केले. नितीश यांचा हा टोमणा लालू यादवांना असल्याचे बोलले जाते.