पाटणा : दिवसभराच्या वेगवान घडामोडीत नितीशकुमार यांनी दुसऱ्यांदा भाजपशी काडीमोड घेतला. त्यानंतर राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत राजकीय भूकंप घडविला. सत्तेच्या सारिपाटावर राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीसोबत नव्याने डाव मांडल्यानंतर पुन्हा राज्यापलांची भेट घऊन महाआघाडी सरकार स्थापन करण्याचा दावाही केला. नितीशकुमार यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड झाली.
नितीशकुमार यांनी राज्यपालांकडे १६४ आमदारांची यादी सादर केली. विधानसभेतील प्रभावी संख्याबळ २४२ असून बहुमताचा जादुई आकडा १२२ आहे. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव हे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून बुधवारी दुपारी दोन वाजता शपथ घेतील. नितीशकुमार यांनी आज उचललेले पाऊल २०१७ च्या अगदी उलट आहे. त्यावेळी महाआघाडी सोडून एनडीएत सामील झाले होते. त्यांनी नऊ वर्षांत दुसऱ्यांदा भाजपची साथ सोडली आहे.
नितीशकुमार यांचे धाडसी पाऊल : तेजस्वी
तेजस्वी यादव यांनी म्हटले की, नितीशकुमार हे देशातील सर्वांत अनुभवी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. आदल्या दिवशी जेडीयूच्या बैठकीत वरिष्ठ नेते उपेंद्र कुशवाही यांनी एक ट्विट करून नितीशकुमार यांचे नवीन आघाडीच्या नेतृत्वासाठी अभिनंदन केले. यातून त्यांनी जेडीयू महाआघाडीत सामील होत असल्याचे संकेत दिले होते.
काॅंग्रेसचे मानले आभार...
महाआघाडी सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल नितीशकुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे आभार मानले. ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी फोनवरून बोलले. सूत्रांनुसार नितीशकुमार दिल्ली भेटीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही भेटण्याची शक्यता आहे.
भाजपचा आरोप...
नितीशकुमार यांनी जनादेशाचा विश्वासघात केला. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेसाठी जेडीयूने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपने केला.
विधानसभेतील पक्षीय बलाबलएकूण संख्या : २४३प्रभावी सदस्य संख्या : २४२ (राजदचा एका सदस्य अपात्र)
बहुमताचा आकडा : १२२
महाआघाडीचे संख्याबळ जेडीयू- ४६ (४५ आमदार, एक अपक्षराजद ७९, काँग्रेस १९, भाकपा-माले १२, भाकपा ०२, माकप ०२, हिंदुस्तानी अवाम मोर्चा ०४ (एकूण १६४)भाजप : ७७ । एआयएमआयएम : ०१