ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २० - विश्वासदर्शक ठरावाआधीच बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यामध्ये अपयश येणार असल्याची कल्पना आल्यामुळे त्यांनी आधीच राजीनामा दिल्याची चर्चा आहे. महादलित नेत्याचा अपमान सहन केला जाणार नाही असे सांगत भाजपाने मांझी यांना पाठिंबा घोषित केला होता. त्यापूर्वी नितीशकुमार यांनी मांझी यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. नितीशकुमार यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचे सांगत मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला होता. परंतु, मांझी यांनी पायउतार होण्यास नकार दिला आणि विश्वासदर्शक ठरावाच्या माध्यमातून बहुमत सिद्ध करण्याचा विडा उचलला.
मात्र, आज विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव होण्यापूर्वीच मांझी यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याकडे अपेक्षित आमदारांचा पाठिंबा नसल्याचा तर्क वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मांझीच्या आडून नितीशकुमारांवर वार करण्याचा भाजपाचा प्रयत्न फसल्याचेही दिसून येत आहे. अर्थात, आम्ही केवळ मांझींच्या म्हणजेच न्यायाच्या बाजुने उभे होतो, महादलितांचा अपमान होऊ नये यासाठी मांझींना पाठिंबा देत होतो आणि हा जनता दलाचा अतर्गत मामला आहे अशी भूमिका भाजपाचे नेते शहानवाझ हुसेन यांनी मांडली आहे.
आम्ही जे सांगत होतो त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी व्यक्त केली आहे. मांझी यांनी पूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता असे सांगत आमदारांना विकत घेत घोडेबाजार करण्याचा भाजपाची योजना धुळीस मिळाल्याचेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये वर्षभरात निवडणुका होणार असून त्यादृष्टीने येत्या काळात मुख्यमंत्री कुणाचा असेल यावर निवडणुकांचं भविष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे सध्यातरी बारतीय जनता पार्टीवर नितीशकुमार शिरजोर झाल्याचे दिसून येत आहे.
बिहारचे राजकारण गेले काही महिने ढवळून निघाले असून वर्षभरात होऊ घातलेल्या निवडणुका जिंकण्यासाठी नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांची जोडी व केंद्राचा भक्कम पाठिंबा असलेली भाजपा एकमेकांविरोधात निकरानं लढतिल अशी चिन्हे आहेत. येत्या काही काळात हे दोन्ही गट एकमेकांवर प्रचंड चिखलफेक करतील आणि बिहारचे राजकारण आणखी ढवळून निघेल याची नांदीच जितनराम मांझी प्रकरणाने वाजली आहे.
बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला महादलित मतदार मांझींच्या माध्यमातून भाजपाकडे सरकतो की तो नितीशकुमार यांच्यामागे जातो याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे बिहारमध्ये निवडणुका कधी घ्यायच्या, राष्ट्रपती राजवट लागू करायची का, नितिशकुमारांना मुख्यमंत्री बनण्याची संधी द्यायची का या सगळ्या प्रश्नांमध्ये राज्यपाल काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.