गया - बिहारमधील गया येथे सुरक्षा दले आणि माओवाद्यांदरम्यान, शनिवारी रात्री मोठी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या झोनल कमांडरसह तीन माओवाद्यांना ठार केले. गया येथील बाराचट्टी जंगल परिसरात केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची कोब्रा बटालियन आणि बिहार पोलिसांच्या शोधमोहिमेदरम्यान माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आमनासामना झाला.रात्री १२ वाजून २० मिनिटांपासून दोन्हीकडून गोळीबारास सुरुवात झाली. या चकमकीत माओवाद्यांच्या झोनल कमांडरसह तिघे माओवादी ठार झाले. चकमकीत ठार झालेल्या कमांडरचे नाव आलोक यादव असल्याचे समोर आले आहे. या माओवाद्यांकडून एक एके-४७ आणि एक इन्सास रायफल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या चकमकीनंतर शोधमोहीम सुरू आहे.