पाटणा : मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बालिकागृहात मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या निषेधार्थ डाव्या संघटना तसेच राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आदी भाजपविरोधी पक्षांनी गुरुवारी पुकारलेल्या बिहार बंदला पाटण्यासह राज्याच्या अनेक भागांत चांगला प्रतिसाद मिळाला.गया, आरा, जहानाबाद, शेखपुरा, नालंदा, दरभंगा आदी ठिकाणी विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. केंद्र व नितिशकुमार सरकार यांच्या विरोधात घोषणाही दिल्या. काही ठिकाणी रेल रोको आंदोलने झाले. डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जानकी एक्स्प्रेस रोखून धरली होती. या बिहार बंदला जनता दल (संयुक्त) व भाजपने विरोध दर्शविला होता. पण बंदमध्ये लोक स्वत:हून सहभागी झाले होते. राजदचे नेते तेजस्वी यादव म्हणाले की, बालिकागृहातील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारासंदर्भात गप्प बसलेल्या नितीशकुमार यांना या प्रकरणी मी तोंड उघडायला लावेनच. (वृत्तसंस्था)कोर्टाने घेतली दखलमुझफ्फरपूर अत्याचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व बिहार सरकारकडून उत्तर मागवले आहे. या अत्याचारांना बळी पडलेल्या अल्पवयीन मुलींच्या मुलाखती इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे सातत्याने प्रक्षेपित करत असल्याबद्दल न्या. एम. बी. लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली.
बालिका अत्याचाराच्या विरोधात बिहार बंद; सर्व विरोधी पक्षांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 1:25 AM