पाटणा-
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वातंत्र्य दिनी गांधी मैदानात आयोजित कार्यक्रमात झेंडावंदन केलं. यावेळी बिहारमधील जनतेला संबोधित करताना नितीश कुमार यांनी रोजगार आणि नोकऱ्यांबाबत मोठी घोषणा केली. राज्यातील जनतेसाठी १० लाख नोकऱ्यांसोबतच १० लाख रोजगार म्हणजेच इतर व्यवस्थांमधून अतिरिक्त नोकऱ्या दिल्या जातील अशी घोषणा नितीश कुमार यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही ट्विट करुन मुख्यमंत्र्यांची घोषणा ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे.
"आम्ही राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देऊ. नोकरीबाबात आम्ही जनतेसोबत आहोत. कमीतकमी १० लाख नोकऱ्या उपलब्ध करुन देणं हे आमचं लक्ष्य आहे. मुला-मुलींच्या नोकऱ्यांसह इतर रोजगारासाठीही काम केलं जाईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराची व्यवस्था करुन असंच आमचं म्हणणं आहे. राज्यात इतकं काम वाढलं पाहिजे की रोजगाराचा आकडा २० लाखांपर्यंत पोहोचायला हवा अशी आमची मनस्वी इच्छा आहे. त्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहोत", असं नितीश कुमार म्हणाले.
नितीश कुमार यांनी नुकतंच भाजपाची साथ सोडून महाआघाडीसोबत सत्ता स्थापन केली. या आघाडीत सर्वात लालूप्रसाद यादव यांचा राजद सर्वात मोठा पक्ष आहे. राजद २०२० सालच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राज्यातील युवांसाठी १० लाख नोकऱ्या निर्माण करण्याचं आश्वासन दिलं होतं. सरकार अस्तित्वात येताच पहिल्याच कॅबिनेटमध्ये १० लाख नोकऱ्या देण्याचं जाहीर करू असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं. आता भाजपाकडून तेजस्वी यादव यांच्या आश्वासनाची आठवण करुन दिली जात आहे.