पटणा - लोकसभा निवडणूक 2019 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदान केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सात टप्प्यात निवडणूक प्रक्रिया घेऊन निवडणूक इतकी लांबविण्याची आवश्यकता नव्हती असं मतं मांडले आहे.
यावेळी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, एवढ्या उन्हाळ्याच्या दिवशात मतदान व्हायला नको, फेब्रुवारी-मार्च अथवा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेतल्या पाहिजेत. निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे. त्यावर निवडणुकीची प्रक्रिया इतकी लांबविण्याची गरज आहे का? यावर चर्चा करुन सहमती घेतली पाहिजे. एका टप्प्यात निवडणुका होणं आदर्श आहे पण आपला देश मोठा असल्याने दोन-तीन टप्प्यात निवडणुका व्हायला हव्यात असं त्यांनी सांगितले.
तसेच देशाची भौगोलिक परिस्थिती पाहता एका टप्प्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही मात्र दोन-तीन टप्प्यात निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. निवडणुकीची प्रक्रिया लांबल्याने मतदार, नेते, पक्ष आणि मिडीया सर्वांना त्रास सहन करावा लागतो. इतक्या तापमानात मतदान करण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागतो असं नितीश कुमार म्हणाले.
साध्वी यांच्या विधानावर भाजपा कारवाई करेल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेवर केलेलं विधान स्वीकार करणे योग्य नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम भाजपा करेल. भ्रष्टाचार, गुन्हा आणि धार्मिक तेढ यांच्याशी तडजोड केली जावू शकत नाही.
निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सर्व स्पष्ट होईल. त्यामुळे विरोधकांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे तो लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यावर भाष्य केलं जाईल असंही नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीचा आज अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात बिहारमधील पटणा साहिब, पाटलीपुत्र, नालंदा या मतदारासंघासह 8 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीसोबत युती करुन नितीश कुमार यांची जेडीयू बिहारमध्ये 17 जागा लढवत आहे.