पाटणा - कोणे एके काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाचे भरभरुन कौतुक करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार याच निर्णयाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. नोटाबंदी निर्णयाचे पुरेपुर समर्थन करणाऱ्या नितीश कुमार यांनी नोटाबंदी निर्णयाच्या अपयशास बँकांना जबाबदार ठरवलं आहे. बँकांच्या भूमिकेमुळे नोटाबंदी निर्णयाचा योग्य लाभ जनतेला मिळाला नाही, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
नितीश कुमार पुढे असंही म्हणाले की, सुरुवातीला मी नोटाबंदी निर्णयाचं समर्थन करत होतो, पण या निर्णयामुळे किती जणांना फायदा झाला?. लोकांनी आपल्याकडील पैसे एका ठिकाणाहून दुसरीकडे जमा केले. देशाच्या प्रगतीमध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची असते. बँकांचं काम फक्त ठेवी आणि कर्ज देणे इतकंच नाही. तर विविध योजना राबवण्यात बँकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे,' असे नितीश कुमार म्हणाले.
यावेळी त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणांची आवश्यकता असल्याचेही म्हटले. 'सर्वसामान्य लोकांना कर्ज देताना बँका कठोर भूमिकेत असतात. मात्र जे धनाढ्य कर्ज बुडवून पसार होतात त्यांचं काय? आश्चर्यकारक बाब म्हणजे बँकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हे लक्षात कसे येत नाही?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ''बँकिंग क्षेत्रात सुधारणांची गरज आहे, मी टीका करत नाहीय, फक्त मत व्यक्त करत आहे.देशात विकासासाठी सरकार ज्या निधीची तरतूद करते, त्याच्या योग्यरित्या वाटप करण्यासाठी बँकांना आपली यंत्रणा मजबूत करणं आवश्यक आहे'', असंही ते म्हणाले.