Nitish Kumar INDIA Alliance: काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीची एक बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. खरगे पंतप्रधानपदाचे चेहरा असण्याला काहींनी पाठिंबाही दिला. मात्र, त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. या बैठकीत मानापमान नाट्य घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यातच आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारइंडिया आघाडीचे संयोजक होऊ शकतात, असा दावा केला जात आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार, विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया अलायन्स संयोजकाबाबत लवकरच अंतिम निर्णय घेऊ शकते. इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून नितीश कुमार यांच्या नावाला लवकरच मंजुरी मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांनी याबाबत जेडीयू प्रमुख नितीश कुमार आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. दिल्लीतील बैठकीनंतर नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी नितीश कुमारांना फोन केला होता, अशीही चर्चा होती. याबाबतचा अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
इंडिया आघाडीची होणार व्हर्चुअल मिटिंग
आगामी काही दिवसांत इंडिया आघाडीत सामील घटक पक्षांच्या नेत्यांची एक व्हर्चुअर मिटिंग होणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत संयोजक म्हणून नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयाबाबत आघाडीतील अन्य पक्षांना विश्वासात घेतले जात आहे. यासंदर्भात नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली, असे कळते. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही नितीश कुमार यांना संयोजक बनवण्याचे समर्थन केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर आणण्यात नितीश कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यात एकूण २८ पक्ष आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावर नितीश कुमार नाराज असल्याची चर्चा होती.