- हरीश गुुप्ता
नवी दिल्ली : जनता दल (यू)चे प्रमुख व मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजदसोबत बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन केल्यामुळे भाजप कोंडीत सापडला आहे. बिहार हे भाजपसाठी अतिशय महत्त्वाचे राज्य असून, २०२४च्या लोकसभा निवडणुकांत तिथे कशा रीतीने अधिकाधिक जागा जिंकता येतील याची चिंता आता भाजपला लागली आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपप्रणीत एनडीएने बिहारमधील ४० पैकी ३९ लोकसभा जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपला १७, जनता दल (यू)ला १६, लोक जनशक्ती पक्षाला (लोजप) ६ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकांत एनडीएला ५३.२५ टक्के मते मिळाली होती. २०१४ ला मोदींच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला होता. त्यावेळी बिहारमध्ये भाजपला २९.४० टक्के मते मिळाली होती व २२ जागा जिंकल्या होत्या. लोजप व राष्ट्रीय लोक समता पक्षाला (रालोसप) ९ जागा व ९.४० टक्के मते मिळाली होती.
राजद-काँग्रेस, जनता दल (यू) यांनी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणुका लढविल्या होत्या. त्यांना ४४.५० टक्के मते मिळाली होती. हे चित्र पाहता भाजपला २०२४च्या लोकसभा निवडणुकांत ३० टक्क्यांहून अधिक मते मिळविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत. अनेक पक्ष हे नितीशकुमार यांच्यासोबत असतील असे चित्र आहे. त्यामुळे बिहारबाबत भाजप आता नव्याने रणनीती आखण्याची शक्यता आहे.
इतर पक्षांच्या नेत्यांना घेणार भाजपमध्ये
बिहारमधील बदललेली राजकीय स्थिती पाहता त्या राज्यातील भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची पाटणा येथे मंगळवारी रात्री एक बैठक झाली. बिहारमधील इतर पक्षांच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे धोरण अवलंबिले जाण्याची शक्यता आहे. बिहारमधील जनता दल (यू)चे नेते रामचंद्रप्रसाद सिंह यांना राज्यसभेची पुन्हा उमेदवारी नितीशकुमार यांनी दिली नाही. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. चिराग पासवान यांनीही भाजपमध्ये यावे असेही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
अध्यक्षांविरोधात मांडणार अविश्वास प्रस्ताव
बिहारमध्ये नव्याने अस्तित्त्वात आलेल्या महाआघाडी सरकारने बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचे ठरविले आहे. सिन्हा हे भाजप नेते आहेत. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या वेळेसच नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रीय जनता दलाला (राजद) दिले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने देखील या पदावर दावा केला आहे.
राष्ट्रीय राजकारणाशी संंबंध नाही : प्रशांत किशोर
बिहारमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी या त्या राज्यापुरत्या आहेत. त्यांचा राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची पर्यायी आघाडी निर्माण होण्याशी काहीही संबंध नाही, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. तेजस्वी यादव हे नव्या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, असे प्रशांत किशोर म्हणाले.
गृह मंत्रालयावरून पेच
बिहारमध्ये नवीन सरकारचे गठन तर झाले. परंतु गृह मंत्रालयावरून अद्यापही पेच कायम आहे. तेजस्वी यादव यांना गृह मंत्रालय पाहिजे, तर या सरकारमध्येही मुख्यमंत्री नितीशकुमार गृह खाते त्यांच्याकडेच ठेवू इच्छित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार हे गृह मंत्रालय तेजस्वी यांना देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. नवीन सरकारच्या मंत्री परिषदेच्या सूत्रानुसार, जी खाती पूर्वी भाजपकडे होती, ती राजद, काँग्रेस व हम यांच्यात विभागली जाणार आहेत. जी खाती पूर्वीपासून जदयूकडे होती, ती जदयूकडेच राहणार आहेत. असे झाले तर गृह, वित्त, शिक्षण यांसारखी महत्त्वाची खाती जदयूकडेच राहतील. आमदारांच्या संख्येनुसार राजदला सर्वांत जास्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. राजद बिहारमधील सर्वांत मोठा पक्ष आहे. तेजस्वी यादव मंत्र्यांच्या नावांबाबत विचारविनिमय करीत आहेत. नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळू शकते.