नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी होत असलेली पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कोरोना लसीचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. कोरोना लसीसाठी लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. तसेच केंद्रावर जोरदार हाणामारी देखील पाहायला मिळाली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील गोपाळगंजच्या आंबेडकर भवनमध्ये कोरोना लसीसाठी (Corona Vaccination) लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. लसीकरण केंद्रावर लोकांनी लसीसाठी एकमेकांना धक्काबुक्की केली. मारहाण देखील करण्यात आली. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र लोक ऐकून घेत नसल्याने त्यांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. कोरोना लसीकरण केंद्रावर झालेली मोठी गर्दी आणि गोंधळ पाहून आरोग्य कर्मचारीच पळून गेल्याची घटना समोर आली आहे.
कोरोना लस घेण्यासाठी काही लोक रांगेत उभे होते. याच दरम्यान अचानक धक्काबुक्की सुरू झाली. काही लोकांनी रागाच्या भरात एकमेकांवर खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. ज्यामुळे लसीकरण केंद्रावर खूप मोठा गोंधळ निर्माण झाला. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सौसर भागात लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. लसीकरणासाठी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना लोकांचा निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो. आठ राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनाची तिसरी लाट लवकर येणार?; 'या' 8 राज्यांतील पॉझिटिव्हिटी रेटने वाढवलं टेन्शन, धोक्याचा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेनुसार. तपासणीमध्ये जर पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तेथील संक्रमण हे नियंत्रणाबाहेर आहे. तर केरळचा प़ॉझिटिव्हिटी रेट हा 10.5 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील तब्बल 73 जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा 10 टक्के झाला आहे. ज्यातील 45 जिल्हे हे पूर्वोत्तर राज्यातील आहेत. यामुळेच तज्ज्ञांची विशेष टीम या राज्यांत पाठवण्यात आली आहे. सिक्किम - 19.5%, मणिपूर - 15%, मिझोरम - 11.8%, केरळ - 10.5%, मेघालय - 9.4, अरुणाचल प्रदेश - 7.4%, नागालँड - 6%, त्रिपुरा - 5.6% या राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने चिंता वाढवली आहे.