भागलपूर - नवी दिल्ली-भागलपूर एक्स्प्रेसमध्ये बुधवारी (9 जानेवारी) मोठ्या दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी बंदुक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना मारहाण केली आहे. लखीसराई जिल्ह्यातील धनौरी-काजरा भागात ही घटना घडली. प्रवाशांकडून जवळपास 25 लाख रुपये, दागिने, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू दरोडेखोरांनी लूटल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी भागलपूरला जाणारी 12350 ही एक्स्प्रेस आपत्कालीन चैन ओढून एका निर्मनुष्य ठिकाणी थांबवली. प्रवाशांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू हिसकावून घेण्यात आल्या. एक्स्प्रेसमधील काही प्रवाशांनी दरोडेखोरांना विरोध केला असता त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला तसेच एक्स्प्रेसमध्ये गोळीबारही करण्यात आला. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
प्रवाशांची लाखोंची संपत्ती लुटून नेत दरोडेखोर पसार झाले. त्यानंतर एक्स्प्रेस जमालपूरच्या दिशेने रवाना झाली. जमालपूर रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस पोहचल्यानंतर प्रवाशांनी याबाबत तक्रार दाखल केली. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याआधीही एक्स्प्रेस थांबवून प्रवाशांना लूटल्याचे प्रकार समोर आले आहेत.