पाटणा - कोरोना महामारीच्या संकटात बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपा जेडीयू याठिकाणी एकत्र निवडणूक लढवत आहेत. भाजपाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा घोषित केला असून यात मुख्य म्हणजे कोरोनाचा महामारीचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आता बिहारचे उपमुख्यमंत्री आण भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पाटण्यात भाजपाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात बिहारमधील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केलीय. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या 2 दिवसांपासून शरीरात हलका ताप होता, इतर सर्व पॅरामीटर नॉर्मल आहेत. मात्र, काळजी म्हणून एम्समध्ये दाखल होत असल्याचे मोदींनी ट्विट करुन सांगतिलं.
भाजपाकडून नागरिकांना मोफत कोरोना लस
या जाहीरनाम्यात भाजपाने ११ मोठे संकल्प केले आणि सत्तेत आल्यानंतर अनेक आश्वासने पूर्ण करण्याचा दावा केला. “भाजपा है तो भरोसा है’ ५ सूत्रे, एक लक्ष्य, ११ संकल्प' यासह भाजपाने नवीन नाराही दिला आहे. पाटण्यात जाहीरनामा जाहीर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भाजप नेते भूपेंद्र यादव आणि इतर नेत्यांनी पत्रकार परिषदेत भाषण केले. निर्मला सीतारामन यांनी माध्यमांना सांगितले की, कोरोना लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत मास्क हाच उपाय आहे. परंतु ही लस येताच ती मोठ्या प्रमाणात भारतात तयार होईल. ही लस बिहारच्या लोकांना मोफत दिली जाईल असं आश्वासन भाजपानं दिलं आहे.