अहमदाबाद : स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लोकार्पण सोहळ्याला 15 दिवस सुद्धा उलटले नाहीत, तर त्याआधीच याठिकाणी असलेली लिफ्ट बंद पडल्याची घटना मंगळवारी घडली. ज्यावेळी स्टॅच्यू ऑफ युनिटीची लिफ्ट बंद पडली. त्यावेळी लिफ्टमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासमवेत गुजरातचे ऊर्जामंत्री सौरभ पटेल आणि काही अधिकारी अडकले होते.
ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी गुजरातमधूनच नव्हे तर इतर राज्यातूनही लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी स्टॅच्यू ऑफ युनिटीला मंगळवारी भेट दिली. तेव्हा सुशील मोदी लिफ्टने व्ह्यूईंग गॅलरीत जात असताना लिफ्ट बंद पडली. तेव्हा लिफ्टमध्ये सुशील मोदी यांच्यासमवेत गुजरातचे ऊर्जामंत्री सौरभ पटेल आणि काही अधिकारीदेखील उपस्थित होते.
दरम्यान, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे लिफ्ट अडकली होती. मात्र, लिफ्टमधील काही लोक बाहेर पडल्यानंतर लिफ्ट पुन्हा सुरु झाली, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.