पटना : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली आहे. त्यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. ते एनडीएचे उमेदवार म्हणून राजकीय मैदानात आपले नशीब अजमावण्याची शक्यता आहे. याआधी गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक लढण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र, भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले होते.
गुप्तेश्वर पांडे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांची बिहारच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. बिहारचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ २८ फ्रेबुवारी २०२१ पर्यंत होता. मात्र, त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. याआधी २००९ मध्ये गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यावेळी बक्सर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते.
बक्सरचे भाजपा खासदार लालमुनी चौबे यांना पक्ष पुन्हा तिकीट देणार नाही, अशी आशा गुप्तेश्वर पांडे यांना होती. मात्र, भाजपाने लालमुनी चौबे यांनाच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्यामुळे राजीनामा दिलेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी पुन्हा पोलीस सेवेत येण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.
गुप्तेश्वर पांडे यांनी त्यावेळी राजीनामा दिल्यानंतर नऊ महिन्यांनी पुन्हा पोलीस सेवेत रुजू होण्यासाठी बिहार सरकारला विनंती केली होती. त्यानंतर बिहारमधील मुख्यंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने गुप्तेश्वर पांडे यांचा अर्ज स्वीकारला आणि राजीनामा परत दिला. २००९ मध्ये गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती, त्यावेळी ते आयजी होते. त्यानंतर २०१९ मध्ये डीजीपी बनले होते. दरम्यान, गुप्तेश्वर पांडे यांनी आता पुन्हा बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.
सुशांतच्या मृत्यू प्रकरणात चर्चेतबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांकडून पटनामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांच्या आदेशानंतर बिहार पोलिसांचे एक पथक तपासासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी या पथकातील आयपीएस विनय तिवारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाइन करण्यात आले. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला होता.
आणखी बातम्या..
- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज
- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो
- मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी
- Mumbai Rains: अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापने बंद; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन