नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिली. महाआघाडीत एकूण 70 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ 19 जागाच जिंकता आल्या. आता या सुमार कामगिरीवरून राज्यात काँग्रेसमध्येच विरोधाचे स्वर उमटू लागले आहेत. अनेक वरिष्ठ नेत्यांनी तर पक्षाच्या जगा घसरल्याबद्दल गांधी कुटुंबालाच जबाबदार धरले आहे. अशाच एका असंतुष्ट गटाने म्हटले आहे, की काँग्रेसमुळेच महाआघाडीतील सहकारी पक्ष राजद आणि डाव्या पक्षांना फटका बसला आहे.
महाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती. यांपैकी त्यांनी 75 जागा जिंकल्या आहेत. तसेच १९ जागांवर लढलेल्या CPI-MLनेही १२ जागांवर विजय मिळवला आहे. अर्थात महाआघाडीत काँग्रेसच्या विजयाची सरासरी सर्वात कमी आहे.
बिहार काँग्रेसमधील नेत्यांनी म्हटले आहे, की बिहार निवडणुकीसाठी पक्षाने चुकीच्या माणसांना तिकीट दिले. याच बरोबर AIMIM फॅक्टर आणि अखेरच्या टप्प्यात झालेल्या मतांच्या ध्रुवीकरणाचाही त्यांना फटका बसला. याच बरोबर काही नेत्यांनी म्हटले आहे, की काँग्रेसला अशा १३ जागा मिळाल्या होत्या, जेथे काँग्रेसने आतापर्यंत निवडणूकच लढवलेली नव्हती. मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांत पक्षाची कामगिरी चांगली राहिली. याशिवाय काँग्रेसने अशा २६ जागांवर निवडणूक लढवली होती, जेथे गेल्या तीन दशकांत महाआघाडीतील कुण्याही पक्षाला विजय मिळवला आलेला नाही.
३७ जागांवर भाजपशी थेट लढत -काँग्रेसची ७० पैकी ३७ जागांवर भाजपशी थेट लढत झाली. त्यातील फक्त ७ जागा काँग्रेसला जिंकता आल्या. जनता दल (यू.) पक्षाच्या उमेदवारांविरोधात काँग्रेसने १० जागा जिंकल्या. बिहारमध्ये लढविलेल्या जागांपैकी काँग्रेसला ५१ जागांवर पराभव पत्करावा लागला. बिहार निवडणुकीच्या काँग्रेस रणनीतीची सारी सूत्रे रणदीप सुरजेवाला यांच्या हाती सोपविण्यात आली होती.
पांडे फक्त सहायकाच्या भूमिकेत -काँग्रेस नेते अविनाश पांडे हे फक्त सहायकाच्या भूमिकेत दिसले. हमखास हरतील असे उमेदवार काँग्रेसने वीस जागांवर उभे केले होते असा आरोप त्या पक्षाच्या काही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केला. २४३ सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांत एनडीएने १२५ जागांवर जिंकल्या असून त्यांना निसटते बहुमत मिळाले.