किस्सा कुर्सी का! खुर्चीवरून आमदार अन् डॉक्टरांमध्ये जुंपली; रुग्णालयात रंगलं मानापमान नाट्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 04:15 PM2021-05-22T16:15:11+5:302021-05-22T16:15:46+5:30
आमदारांनी डॉक्टरांना करून दिली प्रोटोकॉलची आठवण; तरीही डॉक्टरांनी दिली नाही खुर्ची
वैशाली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र तरीही देशातील आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असतानाही काही ठिकाणी मानापमान नाट्य घडत आहे. प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्यातील वाद अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्यानं कोरोना रुग्ण वैतागला, शेतात जाऊन बसला; अन् ३ दिवसांनी...
बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील राजापाकर येथील एका अतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आश्चर्यजनक घटना घडली. राजापाकर मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार प्रतिमा कुमारी रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. रुग्णालयाची पाहणी करता करता त्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचल्या. तिथे असलेल्या डॉक्टरांना प्रोटोकॉलची आठवण करून देत कुमारी यांनी त्यांची खुर्ची देण्यास सांगितलं. मात्र डॉक्टरांनी आमदार कुमारी यांना खुर्ची देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.
दुर्दैवी! कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, तरीही आईच्या पार्थिवाला अग्नी देण्यास मुलाचा नकार, बहिणींचा आक्रोश
तुम्ही इथे बसा, असं म्हणत आमदार कुमारी यांनी डॉ. श्याम बाबू सिंह यांना दुसरीकडे बसण्यास सांगितलं. मात्र सिंह यांनी तिथे बसण्यास नकार दिला. कुमारी यांनी सिंह यांना प्रोटोकॉल सांगितला. त्यावर मला असा कोणताही आदेश मिळालेला नाही, अशी कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे माझी खुर्ची देणार नाही, असं सिंह म्हणाले. त्यामुळे केबिनमध्ये काही वेळ तणावाचं वातावरण होतं.
डॉ. श्याम बाबू सिंह यांचं उत्तर ऐकून कुमारी यांना काहीसा धक्का बसला. डॉक्टर त्यांच्या विधानावर ठाम होते. त्यामुळे केबिनमध्ये भलताच पेच प्रसंग निर्माण राहिला. डॉ. सिंह यांनी शेवटपर्यंत त्यांची खुर्ची सोडली नाही. त्यामुळे केबिनमध्ये असलेल्या एका कर्मचाऱ्यानं आमदार कुमारी यांना दुसरी खुर्ची आणून दिली. त्यानंतर कुमारी त्या खुर्चीत बसल्या. मुख्यमंत्री नितीश कुमार कमजोर झाल्यानं आता रुग्णालयातील डॉक्टरदेखील प्रोटोकॉल पाळत नाही. त्यांनी लोकप्रतिनिधींबद्दल आदर नाही, अशी टीका कुमारी यांनी केली.