नवी दिल्ली - बिहारमध्येशिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मुलांना चांगल्या मूलभूत सुविधांसह चांगलं शिक्षण देणं आणि त्यांना चांगलं भविष्य घडवण्यास मदत करणं, हा त्याचा उद्देश आहे. असं असतानाही बिहारमधील कटिहार जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षणाचं असं चित्र समोर आलं आहे, जे पाहून तिथल्या शिक्षण व्यवस्थेच्या बिकट अवस्थेचा अंदाज बांधता येईल. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग एकाच खोलीत सुरू आहेत. हिंदी आणि उर्दू भाषेचे वर्ग एकाच खोलीत घेतले जातात. हिंदी आणि उर्दू शिक्षक एकाचवेळी एकाच ब्लॅकबोर्डवर विद्यार्थ्यांना दोन्ही भाषा शिकवतात. एका बाजूला हिंदी भाषिक आणि दुसऱ्या बाजूला उर्दू भाषिक विद्यार्थांना शिकवलं जातं.
बिहारमध्ये शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि मुलांचं भविष्य सुधारण्यासाठी सुविधांचा विस्तार करण्याचे दावे दररोज केले जात आहेत, मात्र कटिहारमधून असं चित्र समोर आलं आहे, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जिल्ह्यातील मनिहारी ब्लॉकमध्ये असलेल्या उर्दू प्राथमिक शाळेच्या एकाच खोलीत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग चालवले जातात. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे एकाच ब्लॅकबोर्डवर दोन शिक्षक एकाच वेळी उर्दू आणि हिंदी भाषा शिकवतात.
मनिहारी ब्लॉकमधील उर्दू प्राथमिक शाळा 2017 मध्ये विश्वनाथ चौधरी आदर्श माध्यमिक विद्यालय आझमपूर गोला येथे हलविण्यात आली. तेव्हापासून वर्गाची ही समस्या कायम आहे. आझमपूर गोला येथील विश्वनाथ चौधरी आदर्श माध्यमिक शाळेच्या शिक्षिका नीलम कुमारी सांगतात की त्यांच्याकडे आधीच खोल्यांची कमतरता होती. प्रशासकीय आदेशानंतर इयत्ता 1 ते 5 वी साठी एकच खोली दिली जाऊ शकते. तेव्हापासून आजपर्यंत इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग एकाच खोलीत सुरू आहेत.
एकाच खोलीत आणि एकाच ब्लॅकबोर्डवर हिंदी आणि उर्दू एकत्र शिकवण्याच्या सक्तीबाबत उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मणिहारी प्रफुल्लित मिंज सांगतात की, शाळेत तीन शिक्षक आहेत. परंतु खोली आणि ब्लॅकबोर्ड नसल्यामुळे असं करावं लागत आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी कामेश्वर प्रसाद गुप्ता सांगतात की, त्यांना आता या विषयाची माहिती मिळाली आहे. मनिहारी गटशिक्षणाधिकार्यांशी बोलणं झालं असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असं सांगितलं गेलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.