पाटणा: गलवान खोऱ्यात बिहारचे जवान शहीद झाले. मात्र त्यांनी भारतमातेची मान झुकू दिली नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही बिहारच्या जवानांनी बलिदान दिलं. त्यांनी मी शतश: वंदन करतो, असं मोदी पुढे म्हणाले. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना बिहार मागे पडला . बिहारची १० वर्षे वाया गेली, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.'एनडीए सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवलं. आम्ही सत्तेत आलो तर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करू, असं विरोधक म्हणतात आणि वर बिहारमध्ये येऊन इथल्या जनतेकडे मतं मागण्याची हिंमत करतात. हा बिहारमधील जनतेचा अपमान नाही का?', असा सवाल मोदींनी उपस्थित केला. बिहार आपल्या सुपुत्रांना देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पाठवतो. पण कलम ३७० पुन्हा आणू म्हणून विरोधक त्या सुपुत्रांचा आणि बिहारचा अपमान करतात, असं मोदी म्हणाले.
Bihar Election 2020: गलवान खोऱ्यात, पुलवामा हल्ल्यात तिरंग्यासाठी बिहारचे सुपुत्र शहीद झाले- पंतप्रधान मोदी
By कुणाल गवाणकर | Published: October 23, 2020 1:30 PM