मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी पक्षातर्फे फडणवीस यांना तसे कळविण्यात आले आहे. बिहारमध्ये चालू वर्षाअखेर निवडणूक होत आहे. फडणवीस यांनी या निवडणुकीच्या प्रत्यक्षकामात भाग घेतला असून बिहार प्रदेश कार्यकारिणीशी ऑनलाईन संवाद साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (23 ऑगस्ट) बिहारच्या भाजपा प्रदेश कार्यकारणीशी संवाद साधला. बिहार विधानलभा निवडणुकीसाठी ऑनलाईन नामांकन दाखल केले जाणार आहेत. तसेच निवडणुकीदरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक नियमांचेही पालन करावे लागणार आहे. या निवडणुकीचा प्रचारही डिजिटलच होणार आहे. जास्तीत जास्त मतदारांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधा. सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करून मतदारांच्या समस्या जाणून घ्या. भाजपाचे कार्यही त्यांच्यापर्यंत पोहोचवा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती मिळत आहे.
फडणवीस यांनी नव्या भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप मेहनत घेत आहेत. बिहारनेही मोदींना नेहमीच साथ दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीतही बिहारची जनता भाजपाच्या मागे उभी राहायला हवी असं म्हटलं आहे. तसेच ही केवळ डिजिटल माध्यमातून होणारी निवडणूक नाही. तर बिहारचा नवा इतिहास लिहिणारी ही निवडणूक आहे. कितीही संकट आलं, कितीही वादळं आली तरी भाजपाचा रथ कोणी रोखू शकलेला नाही. जेव्हा जेव्हा लोकशाहीवर आक्रमणं झाली तेव्हा तेव्हा सर्वात आधी बिहारमधूनच त्याविरोधात पहिला आवाज उठला. बिहारमधूनच मोठी लढाई लढली गेली असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.
बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा असून जदयू, भाजपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. फडणवीस यांची प्रतिमा संयमी नेता अशी आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयू हा तेथे मोठा पक्ष आहे. अशा वेळी 243 जागांपैकी जास्तीत जास्त जागा भाजपाकडे घेताना फडणवीस तसेच बिहार भाजपचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचा कस लागणार आहे. यानिमित्ताने फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, फडणवीस यांच्या निकटस्थांनी सांगितले की, ही जबाबदारी केवळ बिहार निवडणुकीपुरतीच मर्यादित आहे. फडणवीस राष्ट्रीय राजकारणात तूर्त अजिबात जाणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : चिमुकल्यांना मास्क लावणं गरजेचं आहे की नाही?, WHO ने जारी केले नवे नियम
'ती' भेट ठरली जीवघेणी! प्रेयसीला लपूनछपून भेटणं पडलं महागात, गावकऱ्यांनी केली तरुणाची हत्या
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, पुन्हा नवा उच्चांक गाठला
राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती
देशी युद्धनौका INS Vikrant मारणार अथांग समुद्रात सूर; 26 लढाऊ विमानांसह चाचणी सुरू