पाटणा -बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे आज सायंकाळी जनता दल (युनायटेड)मध्ये सामील होत आहेत. पांडे यांनी नुकतीच स्वेच्छा निवृत्ती (व्हीआरएस) घेतली होती. तेव्हापासूनच ते राजकारणात जातील, असे कयास लावले जात होते. तत्पूर्वी पांडे यांनी शनिवारी जेडीयूच्या मुख्यालयात जाऊन मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. यानंतर, ते जेडीयूमध्ये सामील होतील आणि विधानसभा निवडणूक लढतील, असे अंदाज वर्तवण्यात येत होते.
पाटणा येथील जेडीयू मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार, यांच्या भेटीनंतर पांडे म्हणाले, 'माझी कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. त्यांचे आभार मानण्यासाठी आलो होतो. त्यांनी मला काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यांनी दिलेल्या समर्थनाबद्दल, सेवानिवृत्तीपश्चात त्यांचे आभार व्यक्त करण्याची इच्छा होती.'
गुप्तेश्वर हे आपल्या बक्सर जिल्ह्यातून बिहार विधानसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू आहे. गुप्तेश्वर पांडे, हे फेब्रुवारी 2021मध्ये सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्यांनी, पाच महिने आधीच मंगळवारी पोलीस सेवेतून स्वेच्छा निवृत्ती (व्हीआरएस) घेतली. 22 सप्टेंबरला रात्री उशिरा राज्याच्या गृह विभागाने जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार, त्यांच्या व्हीआरएसच्या निर्णयाला राज्यपाल फागू चौहान यांनी मंजुरी दिली आहे.
सोशल मीडियावर 23 सप्टेंबररोजी, 'मेरी कहनी मेरी जुबानी' या शीर्षकाखाली बोलताना पांडे म्हणाले होते, 'जर संधी मिळाली आणि मी राजकारणात येण्या योग्य आहे, असे समजले गेले, तर मी राजकारणात येऊ शकतो. मात्र, जे लोक आमच्या मातितील आहेत, ते लोक हा निर्णय घेतील. बिहारचे नागरिक आहेत आणि त्यातही पहिला अधिकार बक्सरच्या लोकांना असेल. जेथे मी लहानाचा मोठा झालो आहे.'
गुप्तेश्वर पांडे यांनी 2009मध्ये लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सेवेचा राजीनामा दिला होता. मात्र राज्य सरकारने त्यांचा राजीनामा नामंजूर करत, काही महिन्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेतले होते.