बिहारच्या सिवान जिल्ह्यातील सादिया परवीनने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ती जिल्ह्यातील पहिली मुस्लिम महिला पायलट ठरली आहे. सादियाने UAE येथून पायलटचं ट्रेनिंग घेतलं होतं. सादियाने सांगितलं की, तिचं लहानपणापासून विमान उडवण्याचं स्वप्न होतं आणि आता हे स्वप्न पूर्ण झालं आहे. तिचे वडील देखील शेतकरी आणि व्यापारी आहेत. त्यांनी नेहमीच तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तिला प्रेरित केलं आहे.
सादियाने कोलकाता येथून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर दोन वर्षे युएईमध्ये पायलटचे ट्रेनिंग घेतलं. आता ती लायसन्स प्राप्त पायलट आहे. सादिया ही मूळची सिवानच्या रघुनाथपूर ब्लॉकमधील मियाचाडीची आहे. सध्या ती कोलकात्यामध्ये राहते. मात्र आई, वडील आणि इतर कुटुंबीय गावी राहतात.
सादियाला मिळालेल्या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाची लाट उसळली आहे. तिच्या पालकांनी सांगितलं की, त्यांना त्यांच्या मुलीचा खूप अभिमान आहे. तिच्या यशामुळे इतर तरुणांनाही प्रेरणा मिळेल. सादियाने सांगितलं की, तिला एक दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर उड्डाण करायचं आहे.
सादिया सध्या डोमेस्टिक प्लेन उडवत आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात हे तिने सिद्ध केलं आहे. तिने असं फील्ड निवडले आहे जिथे सामान्यत: पुरुष जातात. मात्र सादियाच्या यशामुळे इतर महिलांनाही प्रेरणा मिळेल. इतर महिलांनीही त्यांची स्वप्ने पूर्ण करावीत म्हणून सादियाला त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे.