पाटणा - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा देशात सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत, त्यामुळे उद्योग-व्यवहार आणि जनतेला थोडी मोकळीक दिली असली तरी लॉकडाऊनचे निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आले नाहीत. दरम्यान, राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध पूर्णपणे कधी उठणार असा प्रश्न लोकांना पडत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. केंद्र सरकारने अनलॉक 3 जाहीर केले असून 30 ऑगस्टपर्यंत देशात शिथिलतेचं लॉकडाऊन आहे. मात्र, आता बिहार सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बिहार सरकारने परिपत्रक काढून राज्यातील लॉकडाऊन 6 सप्टेंबरपर्यं वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने 29 जुलै रोजी लॉकडाऊन संदर्भातील आदेश जारी केला होता. त्यानुसार, 30 ऑगस्टपर्यंत देशात लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र, या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. आता, बिहार सरकारने केंद्र सकारच्या या लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी 6 सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.
दरम्यान, राज्याला कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही लॉकडाऊन हटवण्यात येणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक नुकतीच झाली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन हटवण्याची कुठलीही घाई नसल्याचे स्पष्ट केले. उलट ज्या ठिकाणी लॉकडाऊन हटवण्याची घाई करण्यात आली. तिथे पुन्हा लॉकडाऊन केले गेले पाहिजे, असे संकेतच उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले.