पाटणा - कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकार आणि राज्य सरकार झोकून देऊन काम करत आहेत. मात्र, कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र हे कोरोनाचं हॉटस्पॉट राज्य ठरलं असून महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजूरांची संख्या लक्षणीय आहे. त्यात, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये अधिक संख्येने मजूर जातना दिसत आहेत. त्यामुळेच, क्वारंटाईन सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना ठेवण्यात आले आहे. आता, बिहार सरकारने एक मजेशीर निर्णय घेतला आहे. कुटुंब नियोजन योजनेच्या जनजागृतीसाठी क्वारंटाईन सेंटरमधील प्रवाशांना कंडोम देण्यात येणार आहे.
बिहारमधील आरोग्य विभागाने पुढाकार घेत, क्वारंटाईन अवधी पूर्ण केल्यानंतर संबंधित नागरिकांना कंडोम वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर, संबंधित प्रवाशांना कुटुंब नियोजनाचे महत्व अन् माहिती देऊन आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे. डोअर टू डोअर आरोग्य तपासणीवेळी पोलिओच्या सुपरवायझरकडून १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणाऱ्यांस कंडोम देण्यात येणार आहे. नवभारत टाइम्सच्या बातमीनुसार, केअर इंडिया कुटुंब नियोजन समन्वयक अमित कुमार यांनी याबाबत माहिती दिली. पोलिओ अभियानासाठी संबंधित सुपरवायझरांना याचे ट्रेनिंग देण्यात आले असून कंडोमचे बॉक्सही दिले आहेत. घर-घर तपासणीवेळी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणाऱ्यांस हे कंडोम देण्यात येणार आहे.
दरम्यान, सध्या घरवापसी करणाऱ्या प्रवाशांना गावाकडे क्वारंटाईन करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात प्रवासी क्वारंटाईन झाले असून या सर्वांची माहिती प्रशासनाकडे आहे. त्यातून, कुटुंब नियोजन जनजागृतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.