पटना: लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक संघर्षात शहीद झालेल्या राज्यातील भारतीय लष्कराच्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदतीची घोषणा बिहार सरकारने केली आहे.
बिहारमधील पाच शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी 11 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला बिहार सरकारद्वारे नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
गुरुवारी पाटणामधील जयप्रकाश नारायण विमानतळावर गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भोजपूर जिल्ह्यातील जवान चंदन कुमार, सहरसा जिल्ह्यातील जवान कुंदन कुमार, समस्तीपुर जिल्ह्यातील जवान अमन कुमार, वैशाली जिल्ह्यातील जवान जयकिशोर आणि पटना जिल्ह्यातील सुनील कुमार यांच्या पार्थिवाला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, पाच जवानांच्या कुटुबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 11 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 25 लाख रुपये दिले जातील. तसेच, पाचही जवानांच्या कुटुंबातील एका सदस्याला राज्य सरकारकडून नोकरी दिली जाईल. यावेळी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि राज्य सरकारचे अनेक मंत्री उपस्थित होते.
दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे. या घटनेनंतर सीमेवरील तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता लडाख सीमेजवळच नाही तर संपूर्ण सीमेवर जवान सतर्क आहेत.
आणखी बातम्या...
देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती
भारताची चीनला घेरण्याची तयारी, सीमेवर जवान सतर्क, रस्ता बांधणीला वेग
कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"
India China FaceOff : भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला सुनावले, म्हणाले...