पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने दारूबंदी लागू केल्यापासून लपूनछपून दारूची विक्री सुरू झाली असून, ती कोणत्या दर्जाची आहे, हे न पाहताच लोक तिच्यावर उड्या मारू लागले आहेत. काही ठिकाणी तर दारूमध्ये काय मिसळले जात आहे, याचीही माहिती नाही. अशीच विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत बिहारमध्ये चार जण मरण पावले आहेत. त्यापैकी तीन जण राजधानी पाटणामधील असून, एक जण गया शहरातील आहे. याखेरीज पाटण्याच्या रुग्णलयात चार जणांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.विषारी दारूमुळे पाटण्यात तीन जण मरण पावल्याच्या वृत्ताने पोलीस दल सतर्क झाले असून, ठिकठिकाणी छापे मारणे सुरू झाले आहे. अर्थात दारूबंदी असली तरी काही मोठ्या हॉटेलांत रुम बुक करून तिथे पार्ट्या सुरू असल्याचे आढळून आले. पाटण्यातील हॉटेल पनाशमध्ये अशाच प्रकारे मद्यपान करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली. हे सातही जण सुरतमधील साड्यांचे व्यापारी असून, ते एका विवाह समारंभासाठी आले होते. गुजरातमध्ये दारूबंदी असल्याने त्यांनी पाटण्यात येण्यापूर्वी मुंबईत ही दारू विकत घेतली होती. प्रभूकृपाही नाहीअनेक जण दूर पल्ल्याच्या गाड्यांतून दारु आणून लपूनछपून विकत आहेत. सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री असल्याने रेल्वेने आणलेली दारू प्रभुकृपा म्हणून ओळखली जात आहे. मात्र हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला असून, बाहेरील राज्यांतून येणाऱ्या गाड्यांतील प्रवाशांची अनेक ठिकाणी झडती घेणे सुरू झाले आहे. ब्रह्मपुत्रा एक्स्प्रेसच्या पँट्री कारच्या मॅनेजरकडून पोलिसांनी दारूच्या १२ बाटल्या हस्तगत केल्या. (वृत्तसंस्था)दारू बाळगल्यास १0 वर्षे शिक्षेची बिहारमध्ये तरतूद आहे.
बिहारमध्ये विषारी दारूचे चार बळी
By admin | Published: April 28, 2016 4:22 AM