पाटणा : मुसळधार पावसामुळे बिहारची दैना झाली आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. याशिवाय वैद्यकीय सेवेचेही तीन-तेरा वाजले आहेत. राज्यातील महत्त्वाचं रुग्णालय असलेल्या नालंदा वैद्यकीय महाविद्यायात पाणी साचलं आहे. रुग्णालयातील आयसीयूमध्ये तर गुडघाभर पाणी साचल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत. आयसीयूमध्ये स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. मात्र या रुग्णालयात आयसीयूमध्ये चक्क मासे पोहताना दिसत आहेत. नालंदा वैद्यकीय महाविद्यायात पूर्व बिहारमधून हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र पावसामुळे या रुग्णालयात पाणी साचल्यानं रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. रुग्णालय 'जलयुक्त' झाल्यानं विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. 'बिहारमधील दुसरं मोठं रुग्णालय असलेल्या एनएमसीएचला मत्सालयाचं स्वरुप आलं आहे. हा इंद्रदेवाचा स्टंट आहे असं संयुक्त जनता दलाकडून जाहीर केलं जाणार नाही, अशी आशा आहे. सरकारची धोरणं 14 वर्षांपासून चुकत आहेत, हे स्वत: देवसुद्धा निदर्शनास आणून देत आहे,' असं तेजस्वी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
रुग्णालय की मत्सालय? पुरामुळे आयसीयूमध्ये पोहोचले मासे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 12:51 PM