उत्तर प्रदेशच्या ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य यांच्यासारखी आणखी एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. पती आणि दोन मुलांना सोडून शिक्षिका असलेली पत्नी मुख्याध्यापकासह पळून गेली आहे. तिला परत आणण्यासाठी पतीला चकरा माराव्या लागत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील जंदाहा पोलीस स्टेशन हद्दीतील महिपुरा गावातील रहिवासी असलेल्या चंदनसोबत ही घटना घडली आहे.
चंदनने 13 वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 मध्ये सरितासोबत लव्ह मॅरेज केलं होतं, त्यानंतर त्याने सरिताला पुढे जाण्याची संधी दिली. तिला अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य दिले आणि फेब्रुवारी 2022 मध्ये ती सरकारी शाळेत शिक्षिका झाली. शिक्षिका झाल्यानंतर सुमारे दीड वर्षानंतर पत्नी शाळेच्या मुख्याध्यापकासह पळून गेली. त्यामुळे पतीने 7 जुलै रोजी जंदाहा पोलीस ठाण्यात पत्नी आणि शाळेचे मुख्याध्यापक राहुल कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि पोलिसांना पत्नीला परत आणण्याची विनंती केली.
पती चंदनने सांगितले की, तो सरिताला त्याच्या बहिणीच्या सासरच्या घरी भेटला होता. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि 13 वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं. त्यावेळी सरिता दहावी पास होती, पण पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करणाऱ्या चंदननेही आपल्या पत्नीला पुढील शिक्षणासाठी आणि यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. दोघांना 12 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे. चंदनने सांगितले की, 2017 मध्ये सरिताने टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली आणि 25 फेब्रुवारी 2022 रोजी तिची समस्तीपूर जिल्ह्यातील शाहपूर पटोरी येथे असलेल्या नॉनफर जोदपूर या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली.
सरिताची हलाई ओपी परिसरातील मारिचा गावात राहणारे शाळेचे मुख्याध्यापक राहुल कुमार यांच्याशी जवळीक वाढली आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. सरिताच्या मुलाने सांगितले की, आई वाईट आहे त्यामुळे त्याला फक्त वडिलांसोबत राहायचे आहे. दुसरीकडे, पोलिसांनी सांगितले की, शाळेच्या मुख्याध्यापकावर सरिताला फसवूव पळून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.