ऑनलाइन लोकमत
मोतीहारी, दि. ३० - बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यास पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार निवडणुकीतील तीन टप्पे पार पडले असून येत्या आठवड्यात उर्वरित दोन टप्प्यातील मतदान होऊन ८ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. निवडणुकीतील विजयासाठी महाआघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून भाजपानेही ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनवली आहे.
निवडणुकीच्या पुढील दोन टप्प्यात ज्या ५७ मतदारसंघात मतदान होणार आहे, तेथे मुस्लिम नागरिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याच पार्श्वभूमीवर बेतिया येथे झालेल्या सभेत अमित शहांनी हे वक्तव्य केल्याचा कयास व्यक्त होत आहे. ' बिहारमध्ये भाजपचा पराभव झाल्यास तुरुंगात बंद असलेला शाहाबुद्दीन आनंदी होईल आणि पाकिस्तानात फटाके फुटतील, दिवाळी साजरी होईल. पाकमध्ये फटाके फुटावेत असे तुम्हाला वाटते का? असा सवाल अमित शहा यांनी विचारला.
अमित शहांनी उल्लेख केलेला मोहम्मद शहबुद्दीन हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नेता असून लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचा माजी खासदर होता.