लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी बिहारमध्ये पलटूराम मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपासोबत जात इंडिया आघाडीला जोरदार धक्का दिला होता. ज्यांनी आघाडी जन्माला घातली तेच सोडून गेल्याने देशभरात आघाडीची दुर्दशा होत होती. पश्चिम बंगाल, पंजाबसह अन्य राज्यांत प्रादेशिक पक्षांनी सुरुवातीला ताठ भाषा ठेवणाऱ्या काँग्रेसला घायाळ करून टाकले होते. आता बऱ्याच दिवसांच्या गुऱ्हाळानंतर बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप जाहीर झाले आहे.
बंगालमध्ये ममतांनी झिडकारल्यानंतर, पंजाबमध्ये भगवंत मान यांनी देखील स्वतंत्र खटका दाबला होता. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी काँग्रेसच्या जागाच जाहीर करून टाकल्या होत्या. नेमका तोच प्रकार महाराष्ट्रात ठाकरे गटाने मविआला विचारात न घेताच केला आहे. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसला ताठर भूमिका घेणे जमलेच नाही, तोवर बिहारमध्ये जागावाटप जाहीर झाले आहे. ही आकडेवारी पाहता तिथेही काँग्रेसची डाळ शिजली नसल्याचे दिसत आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. त्यापैकी २६ जागांवर लालू यादवांचा राजद पक्ष लढणार आहे. तर काँग्रेसला ९ जागा मिळाल्या आहेत. इथे डाव्यांना पाच जागा सोडण्यात आल्या आहेत.
राजदच्या वाट्याला आलेले मतदारसंघ...अररिया, बांका, बक्सर, गया, गोपालगंज, हाजीपुर, जहानाबाद, जमुई, झंझारपुर, मधेपुरा, महाराजगंज, नवादा, पाटलिपुत्र, उजियारपुर, सारण, पूर्णिया, शिवहर, सीतामढ़ी, पूर्वी चंपारण, सिवान, वैशाली, दरभंगा, मधुबनी, मुंगेर, वाल्मीकीनगर, औरंगाबाद हे मतदारसंघ राजदच्या वाट्याला आले आहेत.
तर काँग्रेस कटिहार, किशनगंज, पटना साहिब, सासाराम, भागलपुर, बेतिया, मुजफ्फरपुर, सुपौल, समस्तीपुर या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे.
डाव्यांमध्ये तीन पक्ष, पाच जागा...डाव्यांमध्ये तीन पक्ष असून CPI ML ला काराकाट, आरा, नालंदा या तीन जागा मिळाल्या आहेत. CPI ला बेगुसराय, CPI (M) ला खगड़िया लोकसभा मतदारसंघ सोडण्यात आला आहे.