बिहारच्या जमुईच्या गरही पोलीस स्टेशन परिसरात पतीने पत्नीला सोशल मीडियावर रील बनवण्यास मनाई केल्यावर पत्नी नाराज झाली. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी आपल्या मुलीसह सासरचं घर सोडून पळून गेली आहे. त्यानंतर पतीने पत्नी आणि मुलीचा शोध सुरू केला. तसेच 25 मे रोजी पतीने गरही पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याप्रकरणी लेखी अर्ज देऊन पत्नी आणि मुलीचा शोध घेण्याची विनंती केली आहे.
27 वर्षीय जितेंद्रने 2017 मध्ये मुस्लिम तरुणी तमन्ना प्रवीणसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर तमन्ना गरही पोलीस स्टेशन हद्दीतील मॅनीजोर परिसरात तिच्या सासरच्यांसोबत सीमा देवी म्हणून राहत होती. याच दरम्यान, जितेंद्र गेल्या एक वर्षापासून बंगळुरू येथे कामासाठी गेला होता. सीमा घरी एकटी असल्याने ती इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर एक्टिव्ह राहू लागली.
पती जितेंद्र पत्नीला सोशल मीडियावर एक्टिव्ह राहण्यास मनाई करत होता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, सीमा आपल्या सात वर्षांच्या मुलीसह मंदिरात पूजा करण्याच्या बहाण्याने घरातून निघून गेली आणि तिचा मोबाईल बंद केला. मोबाईल बंद असल्याने पती जितेंद्र अस्वस्थ झाला आणि बंगळुरू येथील काम सोडून घरी परतला. त्यानंतर पत्नी आणि मुलीचा शोध सुरू केला. एवढंच नाही तर 25 मे रोजी गरही पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याप्रकरणी लेखी अर्जही दिला होता.
जितेंद्रने दिलेल्या माहितीनुसार, जमुईमध्ये शिकत असताना त्याची भेट शहरातील तमन्नासोबत झाली. यानंतर ते दोघं एकमेकांवर प्रेम करू लागले. 2017 मध्ये त्याने तमन्नासोबत प्रेमविवाह केला. लग्नानंतर ती सीमा देवी बनून त्याच्या गावी राहात होती. त्याचवेळी, या प्रकरणी गरही पोलीस स्टेशनचे प्रभारी अनिरुद्ध शास्त्री म्हणाले की, तपास सुरू आहे.