ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १८ - बिहार सरकारने दारुबंदीची घोषणा केली असली तरी, दारुबंदीची अंमलबजावणी कशी करणार ते अद्यापही बिहार सरकारने स्पष्ट केलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार बिहार सरकार टप्याटप्याने दारुबंदीची अंमलबजावणी करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये देशी दारु पूर्णपणे बंद करण्यात येईल. त्यानंतर सहा महिन्यांनी दुस-या टप्प्यामध्ये भारतीय बनावटीच्या परदेशी दारुवर बंदी घालण्यात येईल.
बिहारमध्ये फक्त परदेशी दारुची विक्री सुरु ठेवण्याचा विचार असून, ही दुकाने फक्त शहरांमध्ये असतील. गावांमध्ये या दुकानांवर बंदी असेल. बिहारमध्ये सध्या मद्यविक्रीची ६ हजार दुकाने आहेत. दारुबंदी अंमलात आल्यानंतर हजारपेक्षाही कमी दुकाने रहातील. नोव्हेंबर महिन्यात नितीश कुमार यांनी दारुबंदीची घोषणा केली होती.
दारुमुळे महिलां विरोधात घरगुती हिंसाचार वाढला आहे तसेच कुटुंबाची अबाळ होते म्हणून त्यांनी दारुबंदीची घोषणा केली होती. पण दारुबंदीची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर बिहार सरकारला मोठया महसूलावर पाणी सोडावे लागणार आहे.