पटणा - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारचा निकाल महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. यातील सर्वाधिक जागा जिंकेल ते केंद्राच्या सत्ता स्थापनेत निर्णायक भूमिका बजावेल. त्याचमुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जुने राजकीय मतभेद विसरत पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जवळ केलं आहे.
२०१३ मध्ये पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावरून नितीश कुमार यांनी एनडीएपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी एकत्र येत राज्यात सत्ता मिळवली होती. मात्र काही महिन्यात नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी फारकत घेत पुन्हा भाजपाशी घरोबा केला. २०१४ मध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला २ जागा मिळाल्या होत्या असं असतानाही बिहारमध्ये सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जेडीयूला १७ जागा सोडल्या आहेत. बिहारमध्ये १५ टक्के मतांवर जेडीयूचा प्रभाव आहे. त्यामुळे ही मते सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची ठरतात त्यामुळेच ही मते ज्याच्या पारड्यात पडतील त्यांच्या जागा वाढतील म्हणूनच भाजपाने जेडीयूशी तडजोड करण्याची भूमिका घेतली.
बिहारमधील ५० टक्के मतांवर भाजपा आणि जेडीयूचा प्रभाव आहे. तर ३० टक्के मतांवर काँग्रेस आणि लालू यादव यांच्या आरजेडीचा प्रभाव आहे. तर इतर २० टक्के मते निर्णायक असतात. बिहारमध्ये जातीय समीकरणे बघितली तर शहरी भाग, पुरुष आणि उच्च जातींवर भाजपाचा प्रभाव आहे तर जेडीयूवर ग्रामीण महिला, मागासवर्गीय जातींचा पगडा आहे. त्यामुळे बिहारची जनता कोणाला साथ देते याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहे त्यात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २२ जागा, काँग्रेसला २ जागा, एनसीपी १, जेडीयू २, लोक जनशक्ती पार्टी ६, राष्ट्रीय जनता दल(आरजेडी) ४ आणि इतरांना ३ जागा मिळाल्या होत्या.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्रनंतर बिहार राज्याचा निकाल केंद्रातील सत्ता स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जातीयवादाचा प्रभाव असणाऱ्या बिहारमध्ये एकूण ४० जागांपैकी ३४ जागा अनारक्षित तर ६ जागा आरक्षित आहे. देशाच्या राजकारणात बिहारची भूमिका महत्त्वाची असते. सध्या याठिकाणी आरजेडीचे लालूप्रसाद यादव, जेडीयूचे नितीश कुमार, रामविलास पासवान, शरद यादव, उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, शकील अहमद, राजीव प्रताप रुडी या नेत्यांचा समावेश आहे.