लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात प्रचाराला आता रंग चढला आहे. सर्वपक्षीय नेते प्रचारसभा, मेळावे, रोड शो यांच्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोप-प्रत्यारोप आणि टीकाटिप्पण्यांना उधाण आलं आहे. तसेच या ओघात नेतेमंडळींची जीभ घसरण्याचे प्रकारही घडत आहेत. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. येथे लालूप्रसाद यादव यांच्या कन्या आणि सारण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रोहिणी आचार्य यांची प्रचारसभा सुरू असताना आरजेडीच्या नेत्याने एक अजब विधान केले. भाषण देण्याच्या ओघात त्यांनी रोहिणी आचार्य यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करायचं आहे, असं विधान केलं. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी सारवासारव केली. ही घटना घडली तेव्हा खुद्द लालूप्रसाद यादव मंचावर उपस्थित होते.
बिहारमधील सारण लोकसभामधून रोहिणी आचार्य निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपाने राजीव प्रताप रुढी यांना उमेदवारी दिलेली आहे. रोहिणी आचार्य यांच्या प्रचारार्थ बुधवारी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेला लालूप्रसाद यादव हेही उपस्थित होते. त्यावेळी आरजेडीचे आमदार सुनील कुमार सिंह भाषण देत आहेत. त्यादरम्यान, सुनील सिंह यांच्याकडून गडबड झाली. ते म्हणाले की, आरजेडीच्या नेत्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की, रोहिणी आचार्य यांचा मोठ्या मताधिक्याने पराभूत करा. मात्र आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुनील सिंह यांनी स्वत:ला सावरले. मला म्हणायचं होतं की रोहिणी आचार्य यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. येणारा इतिहासही रोहिणी आचार्य यांची आठवण काढेल, असे ते पुढे म्हणाले.
राष्ट्रीय जनता दलाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर रोहिणी आचार्य यांनी २ एप्रिलपासून आपल्या प्रचारसभेला सुरुवात केली होती. प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी रोहिणी आचार्य यांनी लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि बहीण मिसा भारती यांच्यासोबत हरिहरनाथ मंदिरामध्ये जाऊन पूजा केली होती. सारण लोकसभा मतदारसंघात रोहिणी आचार्य यांचा सामना राजीव प्रताप रुढी यांच्याशी होणार आहेत. राजीव प्रताप रुढी हे येथील विद्यमान खासदार आहेत.