लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला आता बऱ्यापैकी रंग चढलेला आहे. दरम्यान, आरोप-प्रत्यारोपही जोरात आहेत. त्यातून नेतेमंडळींकडून काही आक्षेपार्ह विधानंही करण्यात येत आहेत. बिहारमधील सारण लोकसभा मतदारसंघातील आरजेडीच्या उमेदवार आणि लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहणी आचार्य यांनी बिहारे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं आहे. आम्ही सम्राट चौधरी यांच्या आई-वडिलांना ओळखत नाही. ते कुणाचे मुलगे आहे. ते आम्हाला माहिती नाही. ते त्यांचेच मुलगे आहेत की शेजाऱ्यांचे आहेत, आम्हाला माहिती नाही, असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं आहे.
याआधी सम्राट चौधऱी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला अनेकदा लक्ष्य केले आहे. याबाबत रोहिणी आचार्य यांना विचारले असता. त्या म्हणाल्या की, त्यांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या. आमच्या कुटुंबालाच ते शिविगाळ करतील. जर त्यांनी काही काम केलं असतं तर त्यांनी कामांचा उल्लेख केला असता. त्यामुळे त्यांना केवळ आमच्या कुटुंबावर टीका करायची आहे, असे रोहिणी आचार्य म्हणाल्या.
दरम्यान, सम्राट चौधरी यांनी अनेकदा लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंवार टीका केलेली आहे. त्यांनी हल्लीच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला होता. तेजस्वी यादव क्रिकेट खेळत नव्हते. तर ते सहकारी खेळाडूंसाठी पाणी आणण्याचं काम करायचे. लालू प्रसाद यादव यांनी एका पाणी आणणाऱ्याला बिहारचा उपमुख्यमंत्री बनवलं आहे, असा टोला लगावला होता.
एवढंच नाही तर सम्राट चौधरी यांनी लालू प्रसाद यादव यांचे दुसरे पुत्र तेजप्रताप यादव आणि कन्या रोहिणी आचार्य आणि मिसा भारती यांच्यावरही टीका केली होती. ते म्हणाले होते की, लालूंचा दुसरा मुलगा हरे राम हरे राम करतो, त्याला मंत्री बनवले. एक मुलगी सिंगापूरहून निवडणूक लढवण्यासाठी थेट येते. तर एक मुलगी वारंवार पराभूत झाल्यानंतर तिला राज्यसभेवर पाठवलं जातं.