लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज आज देशभरात सुरू आहे. देशातील २१ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. कडाक्याचा उन्हातही मतदार ठिकठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. मात्र अशा परिस्थितीत देशातील एका मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत एकाही मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला नाही. येथे मतदारांनी मतदान न करण्यााबाबत धक्कादायक कारण समोर आलं आहे.
बिहारमधील लोकसभेच्या चार जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यापैकी जमुई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मुंगेर जिल्ह्यातील प्राथमिक विद्यालय, गयाघाट मतदान केंद्र -२५८ येथे दुपारी १२ वाजेपर्यंत एकही मत पडलेलं नाही. येथील एकाही मतदाराने आपल्या मताधिकाराचा हक्क बजावलेला नाही. हे मतदान केंद्र गावापासून २०-२५ किमी दूर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत कडक उन्हाळा आणि लांबचं अंतर यामुळे येथील मतदार मतदान करण्यासाठी पोहोचलेले नाहीत. मात्र पुढच्या काही काळात मतदार येथे मतदानासाठी येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने नक्षल प्रभावित ५ मतदान केंद्रांना नक्षल प्रभावित भागाच्या बाहेर स्थापित केले आहे. त्यामुळे भीमबांध जंगलात असलेल्या वनविभागाच्या विश्रांतीगृहात असलेलं मतदान केंद्र तिथून हटवून २५ किमी दूर अंतरावर असलेल्या जमुई-खडगपूर मुख्य मार्गावर असलेल्या प्राथमिक शाळेत हलवण्यात आलं आहे. येथे मतदारांची एकूण संख्या ही ४१९ आहे. मात्र अंतर लांब असल्याने येथील मतदार मतदान करण्यासाठी जाण्यास फारसे उत्सूक नसल्याचे दिसत आहेत.