पाटणा : बिहारमध्ये धर्मनिरपेक्ष महायुतीचे जागावाटप बुधवारी जाहीर झाले. सत्ताधारी जेडीयू आणि राजद प्रत्येकी १०० तर काँग्रेस ४० जागा लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव व काँग्रेस प्रभारी सरचिटणीस सी.पी. जोशी यावेळी उपस्थित होते.विधानसभेच्या २४३ जागांपैकी तीन जागांबाबत निर्णय घेण्यात आला नसून, त्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देणार असल्याचे संकेत दिले गेले. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने धर्मनिरपेक्ष पक्षांना साथ दिली होती. या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीत सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा असल्याचे नितीशकुमार यांनी म्हटले. लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुलायमसिंग यांच्या समाजवादी पक्षाला एकही जागा देण्यात आली नाही. (वृत्तसंस्था)पवारांचे हितगुजराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी काँग्रेस आणि भाजपा वगळता उर्वरित पक्षांच्या नेत्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले. काँग्रेसेतर आणि भाजपेतर पक्षांचा तिसरा पर्याय तयार करण्याची त्यांची इच्छा असल्याची जोरदार चर्चा असली तरी बिहारच्या महाआघाडीत स्थान मिळविणे हा त्यामागील अंतस्थ हेतू असल्याचा होरा आहे. सध्या नितिश-लालू यांच्या आघाडीने राष्ट्रवादीला एकही जागा सोडलेली नाही. या बैठकीत समाजवादी पार्टी, संयुक्त जनता दल, तृणमूल काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सहभागी झाले.
बिहारमध्ये भाजपाविरोधात महायुतीची मोट
By admin | Published: August 13, 2015 4:21 AM