नालंदा: बिहारच्या नालंदा जिल्ह्यात 150 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या 4 वर्षीय चिमुकल्याला 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नालंदाच्या कुल गावात ही घटना घडली. जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली बचाव मोहीम राबविण्यात आली. एनडीआरएफच्या पथकाने बचाव मोहीम राबवली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवम नावाचा 4 वर्षीय मुलगा खेळता-खेळता 150 फूट खोल बोअरमध्ये पडला. त्याची आई जवळच शेतात काम करत होती. मुलगा बोअरमध्ये पडल्याचे कळताच आई घाबरली. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी मशीन मागवण्यात आली.
सकाळपासून मुलाच्या सुटकेचे प्रयत्न सुरू होते. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्यांसह वैद्यकीय पथकही घटनास्थळी दाखल झाले. मुलाला पाईपद्वारे बोअरमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यात आले. सुदैवाने चिमुकला 150 फूट खोल बोअरवेलमध्ये 40 ते 50 फूटांवर अडकला होता. 8 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर त्या चिमुकल्याची सुटका झाली.