ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - बिहारमधील जागावाटपावरुन एनडीएत धुसफूस सुरु झाली असून लोकजनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान या जागावाटपावर नाराज आहेत. बिहार निवडणुकीसाठी एनडीएतील जागावाटप बघून आम्हाला धक्का बसला असून हे जागावाटप ठरल्याप्रमाणे नाही अशा शब्दात पक्षाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सोमवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत बिहार निवडणुकीसाठी एनडीएतील जागावाटप जाहीर केले. यात भाजपा १६०, पासवान यांचा लोजपा ४०, उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोकसमता पक्ष २३, तर जीतनराम मांझींचा हिंदुस्तान आवाम पक्ष २० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. आमच्यात आता कोणतीही कुरबूर नाही, या जागावाटपावर सर्व पक्ष समाधानी आहेत असा दावाही अमित शहा यांनी केला होता. मात्र मंगळवारी पासवाने यांचा मुलगा व लोजपाचे नेते चिराग पासवान यांनी जागावाटपावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. 'जागावाटपावरुन लोजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे, मी काल रात्री अमित शहांची भेट घेत आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडली आहे' असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. ज्या आधारे रालोसपाला जागा देण्यात आल्या, त्याच आधारे आम्हालाही जागा द्याव्यात, लोकसभेत रालोसपाचे तीन खासदार निवडून आले व विधानसभेत त्यांन २३ जागा देण्यात आला. तर लोकसभेत लोजपाचे सहा खासदार निवडून आले होते, एका उमेदवारांचा फार कमी अंतराने पराभव झाला पण आम्हाला मात्र फक्त ४० जागा देण्यात आल्या याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कुशवाह यांचा रालोसपा व मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम पक्षाशी कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'जागावाटपावर जे ठरले होते व जे प्रत्यक्षात जाहीर झाले यात तफावत असल्याने आम्हाला धक्का बसला, याला नाराजी म्हणू नका असे सूचक विधानही त्यांनी केले.