ऑनलाइन लोकमत
छपरा/नालंदा, दि. २५ -तांत्रिकाची भेट घेऊन, जादूटोणा करून कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही, असा टोला नीतिशकुमारांना हाणत बिहार चालवण्यासाठी तांत्रिकाची गरज नाही, त्याकरिता लोकशाहीची सक्षम आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला असतानाच महाआघाडीचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एका तांत्रिकाची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठे वादळ निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या सभेत नीतिश कुमारांवर जोरदार हल्ला चढवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीयांना जे अधिकार दिले ते हिरावून घेतले जाणार नाहीत असे सांगत आरक्षणाला कोणताही धक्का पोहोचवणार नाही, अशी हमीही पंतप्रधानांनी यावेळी दिली. वीज, पाणी आणि चांगले रस्ते हा आमचा बिहारसाठी त्रिसूत्री कार्यक्रम असून शिक्षण, रोजगार आणि औषधे हे आमचे व्हिजन असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
आजची ही रॅली म्हणजे केवळ एक सभा नसून परिवर्तनाचा संकल्प करण्यासाठीचा महामेळावा आहे, असे मोदींनी म्हटले. ही निवडणूक फक्त बिहारला नव्हे तर संपूर्ण देशालाही दोनवेळा दिवाळी साजरी करण्याची संधी देणार असल्याचे सांगत त्यांनी बिहारमध्ये भाजपालाच विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
गेल्या अनेक वर्षांपासून बिहारवर राज्य करणा-या नेत्यांनी राज्यासाठी काय कामं केली, काय विकास केला याचा हिशोब जनतेला दिला पाहिजे, पण त्यांनी तो कधीच दिला नाही. ते फक्त मोदींवर टीका करण्यात व्यस्त आहेत. पण आता बिहारची जनता जागी झाली असून लालू- नीतिश कुमार यांचा काळ संपला आहे, असे मोदी म्हणाले. तुम्ही कितीही चिखलफेक केली तरी कमळ हे चिखलातच फुलतं हे लक्षात ठेवा, असेही मोदींनी विरोधकांना ऐकवले.