लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख पशुपती पारस यांनी त्यांचे पुतणे, केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पशुपती पारस एका सभेला संबोधित करताना म्हणाले की, या चांडाळामुळे मी माझ्या मोठ्या भावाला शेवटच्या काळात पाहू शकलो नाही. कोरोना असल्याचं निमित्त करत मला आणि माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला रामविलास पासवान यांची भेट घेऊ दिली नाही. त्यावेळी अखेरच्या क्षणी रामविलास पासवान हे आपल्या कुटुंबातील सर्वांवा शोधत होते. आता जो जसे कर्म करेल, तसंच फळ मिळेल, असा टोलाही पशुपती पारस यांनी लगावला.
बिहारमधील मोठे नेते असलेल्या रामविलास पासवान यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या लोकजनशक्ती पार्टीमध्ये फूट पडली होती. तसेच भाऊ पशुपती पारस यांचा एक गट आणि मुलगा चिराग पासवान यांचा एक गट असे दोन गट पडले होते. त्यानंतर चिराग पासवान यांचं राजकारण संपुष्टात आलं, असा दावा केला जात होता. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चित्र बदलून गेलं. त्यांनी एनडीएमध्ये वाट्याला आलेल्या जागांपैकी सर्वच्या सर्व जागा जिंकून मोदी सरकारमध्ये मंत्रिपदही मिळवलं होतं.
दुसरीकडे पशुपति पारस हे लोकसभा निवडणुकीनंतर बॅकफूटवर गेले होते. त्यांनी केंद्र सरकारमध्ये अन्न प्रक्रिया मंत्री म्हणून काम पाहिलेले होते. तसेच रामविलास पासवान यांच्या पारंपरिक हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्वही केलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने चिराग पासवान यांना पुन्हा जवळ करत पशुपति पारस यांना दूर लोटलं होतं.