लखीसराय:बिहारच्या लखीसरायमध्ये देशी बॉम्बचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 3 मुलांसह 7 जण जखमी झाले आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तीन लहान मुले बॉम्बशी खेळत होते, तेव्हा हे स्फोट झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन चिमुकले बॉम्बशी खेळ होते, तेव्हा एक स्फोट झाला, त्यानंतर काही क्षणात आणखी दोन स्फोट झाले. या घटनेत तिथे उपस्थित 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये तीन मुले, एक मुलगी, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हा स्फोट इतका जोरदार होता की 10 मीटर अंतरावरील विटांची भिंतही कोसळली. हे संपूर्ण प्रकरण पिपरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलीपूर गावातील आहे. या घटनेची माहिती मिळताच एसपी आणि एसडीपीओ घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.
एसपी म्हणाले - देसी बॉम्ब होताएसपी सुशील कुमार यांनी सांगितले की, स्फोट झालेले तिन्ही बॉम्ब हे देशी बनावटीचे होते. वलीपूर गावातील शंकर रजक यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू होते, तिथे एका पिशवीत हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुले खेळत असताना त्यांना ती पिशवी दिसली. त्यांनी ती पिशवी उचलून बघीतली आणि चेंडू समजून एक बॉम्ब काढला. यावेळी अचानक त्या बॉम्बचा स्फोट झाला. बॉम्ब कोणी ठेवला आणि कोणत्या उद्देशाने ठेवला याचा तपास सुरू असल्याचे एसपींनी यावेळी सांगितले.