रोहतास:बिहारच्या रोहतास जिल्ह्यातून दुर्दैवी बातमी समोर आली आहे. उड्डाणपुलाच्या खांबांमध्ये अडकलेल्या 11 वर्षीय रंजनचा मृत्यू झाला आहे. खांबांमधून बाहेर काढल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाला बाहेर काढण्यासाठी NDRF आणि स्थानिक प्रशासनाच्या टीमचे 24 तासांपासून बचावकार्य सुरू होते. अखेर रोडचा स्लॅब बुलडोझरच्या सहाय्याने तोडून मुलाला बाहेर काढण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
सविस्तर माहिती अशी की, नसरीगंज दौडनगर येथील 11 वर्षीय रंजन बुधवारी सकाळपासून बेपत्ता होता. मुलगा घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यात आला. यादरम्यान पुलाजवळून एका महिलेला मुलाच्या रडण्याचा आवाज आला. यानंतर महिलेने मुलाबाबत नातेवाईकांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलाला खांबांत अडकलेले पाहिले. यानंतर एनडीआरएफला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
पुलाचा खांब खूप जाड असल्यामुळे तो तोडणे अशक्य होते. शेवटी रोडचा स्लॅब काढण्यात आला. ही सर्व कामे पुलाशी संबंधित तज्ज्ञ पथकाच्या देखरेखीखाली झाली. बुधवारी सायंकाळी चार वाजल्यापासून बचावकार्य सुरू होते. एनडीआरएफच्या टीमने रंजनला ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीने ऑक्सिजन दिले. त्याला शेवटी बाहेर काढले असता तो मृत आढळला. 8 ते 10 तासांपूर्वी मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुलाला मृत येथे आणण्यात आले. तर दुसरीकडे मुलांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय रडून आक्रोश करत आहेत.