पाटणा, दि. 26 - लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांनी 72 तासांमध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा अल्टिमेटम मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिल्याचं वृत्त मंगळवारी आलं होतं. मात्र, नितीश कुमार यांनी तेजस्वी यांचा राजीनामा मागितलेला नाही तसंच कोणतंही स्पष्टीकरण देण्यासही सांगण्यात आलेलं नाही असं लालू यादव यांनी आज स्पष्ट केलं. आज लालू प्रसाद यादव यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती, त्यानंतर ही माहिती त्यांनी दिली.
नितीशकुमार यांनी तेजस्वी यांचा राजीनामा मागितलेला नाही. जिथे गरज लागेल तिथे मी आणि तेजस्वी स्पष्टीकरण देऊ, तितीश महागठबंधनच्या सरकारचे नेते आहेत आणि आमचा पक्ष सरकारच्या प्रत्येक पावलाचं समर्थन करेल असं लालू म्हणाले. येत्या शुक्रवारी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून, तत्पूर्वी तेजस्वींनी राजीनामा न दिल्यास नितीशकुमार त्यांना पदावरून बरखास्त करू शकतात, असं वृत्त काल आलं होतं. नितीशकुमार हे कोणत्याही स्थितीत आपल्या सरकारची प्रतिमा मलिन होऊ देण्यास तयार नाहीत. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तीन आठवड्यांपूर्वी पाटण्यात लालू व त्यांचे पुत्र तेजस्वी यांच्या निवासस्थानांवर छापे मारले होते. त्यामुळे नितीशकुमार यांनी तेजस्वींना मंत्रिमंडळातून पायउतार होण्यास सांगितल्याचं हे वृत्त होतं.
२४३ आमदारांच्या बिहार विधानसभेत सत्ताधारी आघाडीत राजदचे ८०, जदयूचे ७१, तर काँग्रेसचे २७ सदस्य आहेत. विरोधकांत भाजप ५३, लोजप २, आरएलएसपी २, एचएएम १, माकपा (एमएल) ३, अपक्ष ४ आहेत. राज्यातील आघाडीचे काही बरेवाईट झाल्यास बदलती स्थिती लक्षात घेऊन लालूप्रसाद यादव हे मायावतींशी हातमिळवणी करण्याचे संकेत आहेत. तसेच जदयू व भाजप एकत्र येण्याचीही चर्चा आहे. नोटाबंदी, राष्टÑपती निवडणुकीच्या निमित्ताने नितीशकुमार हे रालोआच्या जवळ गेल्याचे मानले जाते. यामुळे राज्यातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.