पाटणा - देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सोमवार २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळाही संपन्न होत आहे. सत्ताधारी भाजपाने या सोहळ्याच्या माध्यमातून देशभरात वातावरण निर्मित्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. तर, दुसरीकडे विरोधक एकत्र येऊन इंडिया आघाडीच्या माध्यमातून मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतेच या आघाडीची बैठकही पार पडली. मात्र, बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानतंर मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून दोन मोठ्या पक्षांची टेबलवर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे २५ ते २७ जानेवारी रोजी याबाबत घोषणाही होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती असल्याचे वृत्त एनबीटी हिंदी वेबसाईटने दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जानेवारी रोजी बिहार दौऱ्यावर येऊ शकतात, अशी माहिती भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार संजय जैस्वाल यांनी दिली. मोतिहारी येथे मोदींचा कार्यक्रम आहे, पण हा कार्यक्रम तुर्तात प्रतिक्षेत ठेवण्यात येणार असल्याचे समजते. कारण, वरिष्ठ पातळीवर टेबलखाली जी चर्चा सुरू आहे, ती चर्चा यशस्वी झाल्यास बिहारमध्ये राजकीय त्सुनामी येऊ शकतो. मात्र, चर्चा फिस्कटल्यास मोदींचा २७ जानेवारीचा दौरा पुढे ढकलला जाईल.
२०१९ च्या निवडणुकांपूर्वी डिसेंबर २०१८ मध्येच भाजपा-जयदू-एलजीपी यांच्यातील लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा झाली होती. मात्र, आता जानेवारी महिना संपत आला तरीही इंडिया आघाडीतील जागावाटपाचं सूत्र अद्याप ठरलं नाही. दुसरीकडे, भाजपानेही जागावाटप निश्चित केलं नाही. सध्या बिहारमध्ये भाजपासोबत चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह आणि जीतन राम मांझी हे आहेत. तरीही भाजपा जागावाटप निश्चितीसाठी आणखी कोणाची वाट पाहात आहे. गत २०१९ च्या निवडणुकांच्या युतीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपा थांबले तर नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने होत आहे.
राजद आमदार सुनिल कुमार सिंह हे सातत्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते गप्प होते, पण अचानक त्यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासमवेत फोटो शेअर करत मेसेज दिला. त्यातून, काही संकेतही निघत आहेत. कुणी कितीही काही म्हणो, बिहारमधील नोकरी मॉडेलचे खरे नायक हे तेजस्वी यादव हेच आहेत, ज्यांनी केवळ ७० दिवसांत २,१७,००० युवकांना नोकरी देऊन त्यांचं भविष्य बनवलं. तेजस्वी यादव यांच्याद्वारे देण्यात आलेलं वचन चुनावी जुमला नही... असे सुनिल कुमार सिंह यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे बिहारचे आरोग्यमंत्री असतानाही बिहारमधील वर्तमानपत्रांच्या जाहिरातीवर कुठेही तेजस्वी यादव यांचा फोटो दिसत नसून फक्त मुख्यमंत्री नितीश कुमार यांचाच फोटो आहे. त्यामुळे, बिहारमधील राजकारण अंतर्गत काहीतरी शिजतयं, जे पुढील काही दिवसांत समोर येईल. त्यामुळे, भाजपकडून सध्या वेट अँड वॉच भूमिका असल्याचं दिसून येतंय.