Patna High Court: बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने केलेला विवाह हा बेकायदा आहे, असा महत्त्वाचा निकाल बिहारमधील पाटणा उच्च न्यायालयाने दिला आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार, अशा प्रकारे केलेला विवाह योग्य नाही. जोपर्यंत दोन्ही व्यक्तींची विवाह करण्याबाबत सहमती नसेल, इच्छा नसेल तसेच सप्तपदीचा विधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत तो विवाह कायदेशीर मानला जात नाही, असे पाटणा उच्च न्यायालयाने नमूद केले.
भारतीय सैन्यातील एका व्यक्तीचा विवाह पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. १० वर्षांपूर्वी बंदुकीचा धाक दाखवत या व्यक्तीचा जबरदस्तीने विवाह करण्यात आला होता. याचिकाकर्ता रविकांत यांचे २०१३ रोजी अपहरण करण्यात आले होते. लखीसराय येथे एका मंदिरात दर्शनासाठी रविकांत गेले होते, त्यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी रविकांत यांचे अपहरण केले आणि त्यांचा विवाह लावून दिला. हुंडा द्यावा लागू नये, यासाठी नवरदेवाचे अपहरण करून लग्न लावून देण्यात होते. बिहारमध्ये ही एक सामाजिक कुप्रथा मानली जात होती. विवाहाचे सर्व विधी पूर्ण व्हायच्या आधीच रविकांत लग्नमंडपातून पळून गेले आणि जम्मू-काश्मीर येथे कामावर रुजू झाले. त्यानंतर सुट्टीवर असताना हा विवाह रद्द करण्यात यावा, अशी याचिका लखीसराय कुटुंब न्यायालयात केली होती. मात्र, सन २०२० मध्ये कुटुंब न्यायालयाने ही याचिका फेटळाली होती.
रविकांत यांनी उच्च न्यायालयात मागितली दाद
कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाविरोधात रविकांत यांनी पाटणा उच्च न्यायालयात दाद मागितली. पाटणा उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला. याचिका दाखल करण्यास खूप उशीर झाला, या कारणास्तव कुटुंब न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. न्यायालयाचा असा दृष्टिकोन चुकीचा होता, असे पाटणा उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. हिंदू परंपरेनुसार ‘सप्तपदी’ विधी केल्याशिवाय कोणताही विवाह वैध ठरू शकत नाही. सप्तपदी विधी न करणे म्हणजे विवाह सोहळा झालाच नाही, असे नाही, असे म्हणणे योग्य नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.