पटना : गेल्या आठवड्यात बिहारमधील पटना पोलीस लाइनमध्ये गोंधळ घातल्याच्या आरोपाखाली 175 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयाने निलंबित केले. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. याप्रकरणी पोलीस मुख्यालय आणखी 70 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलणार आहे.
या पोलीस कर्मचाऱ्यांनाही लवकरच निलंबित करण्याची तयारी सुरु आहे. पोलीस लाइनमध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे गोंधळ घालणाऱ्या 175 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये आणखी 70 पोलीस कर्मचाऱ्यांचा गोंधळ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
ज्या प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात बुद्धा कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांना अटक करण्यासाठी लवकरात लवकर वॉरंट जारी केले जाणार आहे. याप्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम चौकशी समिती करत आहे, अशी माहिती पटना एसएसपी मनु महाराज यांनी दिली.
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील नाराजीचा उद्रेक झाल्याने बिहारमध्ये जवळपास 400 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला होता. प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी सविता पाठकचा मृत्यू झाल्याने हे सर्वजण नाराज होते. सविताला डेंग्यू झाला असतानाही वरिष्ठांनी तिला सुट्टी देण्यास नकार दिला. संतापलेल्या प्रशिक्षणार्थींनी डीएसपी मोहम्मद मसहलुद्दीन यांना मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झालेले ग्रामीण एसपी, शहर एसपी तसंच डीसीपींशी वाद घालत त्यांच्याशीही गैरवर्तवणूक केली.