प्रियंका गांधींबाबत अश्लील ट्वीट करणाऱ्या तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 10:14 AM2019-02-05T10:14:58+5:302019-02-05T10:37:28+5:30
काही दिवसांपूर्वी एका तरुणाने प्रियंका गांधींच्या छायाचित्राशी छेडछाड करुन ट्वीटरवर पोस्ट करुन अश्लील टिप्पणी केली होती. अश्लील ट्वीट करणाऱ्या तरुणाला बिहार पोलिसांनी अटक केली आहे.
नवी दिल्ली - प्रियंका गांधी यांची काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याची घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. मात्र काही दिवसांपूर्वी एका तरुणाने प्रियंका गांधींच्या छायाचित्राशी छेडछाड करुन ट्वीटरवर पोस्ट करुन अश्लील टिप्पणी केली होती. अश्लील ट्वीट करणाऱ्या तरुणाला बिहार पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी सूरजनाथ असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो बिनोदपूरचा रहिवासी आहे. अटक करण्यात आलेला तरुण सोशल मीडियावर स्वतःला मोदी भक्त असल्याचं सांगतो. मात्र, भाजपाने या व्यक्तीशी आपला कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. 30 जानेवारी रोजी सूरजनाथ याच्याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते शाहीन सैय्यद यांनी ही तक्रार केली होती. बिहारच्या कटिहार येथून तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पुण्यामध्ये देखील अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी पुणे शहर महिला काँग्रेसने दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस सरचिटणीस पदी नुकत्याच विराजमान झालेल्या गांधी यांच्या नावाने योगी संजय नाथ आणि ज्योती तिवारी या दोन फेसबुक अकाउंटवर आक्षेपार्ह्य मजकूर असल्याचे पुणे शहर महिलाध्यक्षा सोनाली मारणे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बदनामी करून अब्रुनुकसानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्रयागराजमध्ये प्रियंका गांधींचे पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी ''गंगा की बेटी'' अशा आशयाच्या लावण्यात आलेल्या पोस्टरनंतर प्रियंका गांधी यांना दुर्गा अवतारात दाखवण्यात आलो होते. या पोस्टरमध्ये प्रियंका गांधी महिषासुराचा वध करताना दिसल्या होत्या. प्रियंका गांधी यांचे दुर्गा अवतारातील पोस्टर काँग्रेस नेते इरशाद उल्लाह आणि अनिल चौधरी यांनी लावले. या पोस्टरवर महिला सुरक्षा, महागाई, रोजगार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, राम मंदिर, मुस्लिम-दलित सुरक्षा यांसारखे मुद्यांचाही उल्लेख करण्यात आला होता.