नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput Case) यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. आता सीबीआयने याप्रकरणी तपास सुरू केला आहे. सीबीआयने याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, गुन्हेगारी षडयंत्र रचणे, चोरी-फसवणूक आणि धमकावणे यासारखे गुन्हे या सर्वांवर नोंदवण्यात आले आहेत. याच दरम्यान बिहारपोलिसांनी सुशांतसिंह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे.
८ जून रोजी रिया आपल्या सोबत पैसे, लॅपटॉप क्रेडीट कार्ड आणि दागिने घेऊन गेली असे बिहार सरकारने सुप्रीम कोर्टाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ती आपल्याबरोबर महत्त्वाची कागदपत्रेही नेले असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. रियाने आपल्याला अडकवण्याची धमकी दिल्याची माहिती सुशांतसिंहने आपल्या बहिणीला दिली होती, असं बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
बिहार पोलिसांनी आज सुप्रीम कोर्टात सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात अभिनेता सुशांतसिंह राजपूतला चित्रपटसृष्टीच सोडायची होती, असे नमूद करण्यात आले आहे. आपण जैविक शेती करावी असे त्याला वाटत होते. याच कारणामुळे रिया चक्रवर्तीने सुशांतसिंहला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर धमकी देखील दिली.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात हजर झाली आहे, आर्थिक व्यवहाराप्रकरणी रियाची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रिया चक्रवर्तीसह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात फसवूणक, दगाबाजी, ओलीस ठेवणे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.